पाटण : अतिवृष्टीमध्ये पडलेले विजेचे खांब मोरगिरी परिसरात तशाच अवस्थेत पडून आहेत. त्या खांबांच्या तारा जमिनीवर लोंबकळत आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विजेचे खांब वाकलेले आहेत. चौकात असलेले हे खांब वाहनधारकांनी ठोकारल्याने वाकले आहेत. फक्त तारांचा आधार असल्याने ते पडलेले नाहीत. संबंधित विभागाने असे धोकादायक खांब हटवावेत. आणि त्याठिकाणी नवीन खांब उभारावेत, अशी मागणी मोरगिरीसह परिसरातील गावांमधून केली जात आहे.
कऱ्हाड पालिकेची प्लास्टिक विरोधी मोहीम
कऱ्हाड : शहरातील बाजारपेठेत अनेक दुकानांमध्ये कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर हातगाड्यांवरही त्या वापरात आणल्या जात आहेत. त्यामुळे कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम पालिकेने राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी दोन विक्रेत्यांवर कारवाईही करण्यात आली होती. हातगाड्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरात असल्याचे निदर्शनास आले. कमी जाडीच्या पिशव्या वापरू नयेत, असे आवाहनही पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
काले ते मसूर बस वेळेत सोडण्याची मागणी
कऱ्हाड : काले ते मसूर बस वेळेत येत नसल्यामुळे ग्रामस्थांना बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. सकाळी पावणेसात वाजता सुटणारी काले-मसूर बस सध्या आठ वाजता गावात येते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी कऱ्हाडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कऱ्हाड आगाराने ही बस साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांतून केली जात आहे.
पाटणच्या तहसीलमध्ये अस्ताव्यस्त पार्किंग
रामापूर : पाटण येथील तहसील कार्यालयात दुचाकीची पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे. तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी अस्तव्यस्त लावल्या जातात. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील पार्किंगबाबत कोणीही उपाययोजना करीत नाही. प्रत्येकाची याठिकाणी मनमानी सुरू आहे. त्यामुळे कुणीही या आणि कुठेही वाहने पार्क करा, अशी परिस्थिती दिसून येत आहे. याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्ष घालून पार्किंगची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कऱ्हाड ते ढेबेवाडीपर्यंत दुभाजकात वाढले गवत
मलकापूर : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम झाले. त्यावेळी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली. या रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराने देखभाल दुरूस्ती करण्याची मुदत काही दिवस होती. ती मुदत संपल्यानंतर रस्त्याच्या देखाभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. हळूहळू दुभाजकातील झाडे वाळत गेली. तर पावसामुळे गवत वाढत गेले. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.
पाटण ते चोपडीपर्यंतच्या रस्त्याची स्थिती दयनीय
रामापूर : पाटण, त्रिपुडी ते चोपडी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाटण त्रिपुडी ते चोपडी मार्गावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात झाले आहेत. रस्त्याच्या दुरूस्तीबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दुरूस्ती करण्याची मागणी प्रवासी तसेच ग्रामस्थांमधून केली जात आहे.