सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात ४६ गावे आहेत. त्यापैकी काही गावे अशी आहे की, शासनाने त्यांना शासकीय खर्चाने पाणी दिले नाही तर ती गावे पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित राहणार आहेत. जानुगडेवाडी, शितपवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, धामणी, वाझोली व कुंभारगाव आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. शासनाने या गावांतील शेतकर्यांच्या जमिनी स्लॅबमध्ये गेल्याने काढून घेतल्या आहेत. अशा गावांतील शेतकर्यांना शासकीय उपसासिंचनद्वारे पाणी देण्याची गरज आहे. ज्या गावातील शेतकर्यांच्या जमिनी स्लॅबमध्ये गेलेल्या आहेत त्यांना प्रथम पाणी मिळाले पाहिजे. यासाठी वांगच्या धरणग्रस्तांनी पहिल्यापासून लढा चालू ठेवला आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, अशा शेतकर्यांनीही आपल्या हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे. या धरणामधील वस्तुस्थिती पाहिली तर घोटील गाव ९०% स्थलांतरित झाले. त्यांचे तळमावले (ताईगडेवाडी, ता. पाटण) येथे पुनर्वसन झाले आहे. परंतु, मराठवाडी व जाधववाडी गावची अशंता जमिनी धरणाच्या पाया भरणीत गेल्या आहेत. त्यांचे घर किंवा गावठाण प्रत्यक्षात बाधित न झाल्याने या गावातील धरणग्रस्त पुनर्वसन गावठाणमध्ये स्थलांतरित झालेले नाहीत. मराठवाडी व जाधववाडी या दोन्ही गावांतील धरणग्रस्त स्थलांतरित झाले नसले तरी त्यांना मिळालेल्या जमिनी ते तेथून येऊन-जाऊन करत आहेत. त्याप्रमाणे मेंढ येथील सहा कुटुंबे प्रथम घळभरणीत प्रत्यक्षात बाधित झाल्याने ते घारेवाडी येथील गावठाणात स्थलांतरित झाले आहेत. मात्र, ज्या शेतकर्यांच्या जमिनी पुनर्वसनामध्ये गेलेल्या आहेत, अशा गावांतील शेतकर्यांना कशा प्रकारे पाणी देता येईल, याबाबत कृष्णा खोर्याच्या बैठकीत धरणग्रस्तांनी आढावा घेऊन त्याचा प्रस्तावही शासनाकडे सादर केले आहेत. त्याचा पाठपुरावा घेण्याची गरज आहे. तेव्हा लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी यासाठी पुढाकार घेऊन अधिक उठाव करण्याची गरज आहे. (वार्ताहर)
धरण उशाला; कोरड घशाला! वांग-मराठवाडी प्रकल्प : अनेक गावे पाण्यापासून वंचित
By admin | Updated: May 10, 2014 23:42 IST