वडूज : व्याज दरवाढी व अनुदानाचे बंद झालेले दरवाजे यामुळे गॅस सिलिंडरपासून सामान्य लोक दूर पळून आता घराघरात चुली पेटू लागल्या आहेत, तर विविध कंपन्यांच्या गॅस सिलिंडरच्या गाड्या शहरातील व खेड्यापाड्यातील, गल्लीबोळातील रस्त्यांवर सिलिंडर घ्या हो, असे म्हणत फिरताना आढळून येत आहेत.
यापूर्वी गॅस कॅनेक्शन मिळणे महामुश्कील होते. त्याकाळी इंधन म्हणून लाकडाचा वापर सर्रास होत होता.
शासनाच्या विविध योजनांमुळे, अनुदान आणि काही वर्गासाठी मोफत गॅस कनेक्शन योजना असल्या कारणाने घरोघरी मातीच्या चुलीचे धुराडे बंद होऊन गॅस पेटू लागले. खटाव तालुक्यात सुमारे ६४ हजार १७३ विविध कंपन्यांचे मिळून गॅस कनेक्शन सुरू आहे. बहुतांशी ठिकाणी दुबार सिलिंडर कनेक्शन असल्यामुळे बचत करत सध्या वापर सुरू आहे. यामुळे प्रदूषणमुक्त खेडी झाली होती. सध्या गॅस दराचा भडका आणि अनुदान बंद झाल्यामुळे उलटा प्रवास सुरू झाला. गोरगरीब जनतेला घरगुती गॅस महाग झाल्याने परवडत नसल्याने त्यांनी पर्याय म्हणून चुलीला पुन्हा जवळ केले.
शेतमजूर, रोजंदारीवर जाणारे कामगारवर्ग व अन्य गरीब लोक चुलीवर स्वयंपाक करत आहेत. हॉटेल व्यवसायही कोरोना महामारीमुळे पूर्णतः अडचणीत आला असल्याने कमर्शियल सिलिंडरलाही मागणी थंडावली आहे.
वडूज शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात विविध गॅस कंपनीच्या गाड्या गल्लोगल्ली ग्राहकांनी सिलिंडर घेण्यासाठी आग्रह करीत आहेत; मात्र सिलिंडरचे गगनाला भिडलेले दर आणि कोरोना महामारीमुळे होत असलेली आर्थिक मंदी या कारणाने गॅस वापर काही प्रमाणात कमी करून काट्याकुट्यांचा वापर करीत चुलीचा वापर जोर धरू लागला आहे.
कोट..१
गॅस अनुदान बंद झाल्या कारणाने व वाढती महागाई पाहता सध्या चुलीवर स्वंयपाक करणे परवडत आहे.
-स्वाती पवार, उबंर्डे, ता. खटाव.
कोट२
आमच्यासारख्या रोजदांरीवर काम करणाऱ्यांसाठी गॅस सिलिंडर नाहीत. शासनाच्या योजना फक्त कनेक्शन देण्यापुरत्या आहेत. त्यानंतर महागडे सिलिंडर घेणार कोण, त्यामुळे आमच्या घरात चुलीवरच स्वयंपाक होत असतो.
- लक्ष्मण केंगार, वाकेश्वर.