आजारांमध्ये वाढ
सातारा : जिल्ह्यातील वातावरणात बदल झाल्याने किरकोळ आजारांमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली होती. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान राहत आहे. अशा विपरित वातावरणाचे परिणाम जाणवू लागले आहेत. सर्दी, खोकला, ताप अशा आजारांचे रुग्ण यामुळे वाढले आहेत.
...तर फौजदारी दाखल
सातारा : वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य आहे. असे असतानाही वीज बिल चुकविण्यासाठी काहीजण विद्युत मीटरमध्ये फेरफार करून महावितरणची फसवणूक करत आहेत. तसे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी दाखल करू, असा इशारा अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी दिला आहे.
स्मारकाकडे लक्ष द्या
सातारा : महामाता भीमाई स्मारकाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून अपूर्ण आहे. या कामाच्या पूर्णत्वासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी दलित पँथरचे धराजीराव वाघमारे यांनी केली आहे.
कोबीचे दर गडगडले
सातारा : मागील काही महिन्यांपासून दर नसल्याने टोमॅटो व कोबी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. कोरोना काळात काही दिवस बाजारपेठ बंद असल्याने, तर काही दिवस अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले. या संकटातून मार्ग काढत असतानाच टोमॅटो आणि कोबीला दर नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
अतिक्रमण काढण्याची मागणी
सातारा : म्हसवड ते हिंगणी या ब्रिटिशकालीन रस्त्यावर काही लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वहिवाटीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण काढून रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी उत्तम माने यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
वाजवायला परवानगी द्या
सातारा : कोरोनाच्या काळात कलाकारांचे मोठे हाल झाले आहेत. बँडबाजा कलाकारांच्या हालअपेष्टा लक्षात घेऊन शासनाने त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अन्यथा २ सप्टेंबरला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेने दिला आहे.