सातारा : शहरातील शनिवार पेठेत राहणाऱ्या एका पोल्ट्री चालकाच्या नावावर कर्ज घेत त्याच्याकडून चारचाकी घेऊन त्यालाच धमकावत ४.५७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला.
नितीन जगदीश सचदेव (मूूूूूूळ. रा. सातारा. सध्या रा. अलडोरा महम्मदवाडी, उंड्री, हडपसर, पुणे) आणि राजू खेमाराम चौधरी (रा. शनि मंदिरासमोर, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ज्ञानेश्वर जिजाबा सूळ (३९, रा. शनिवार पेठ, सातारा) यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय असून त्यांचे मित्र नितीन जगदीश सचदेव यांना चारचाकी घ्यायची होती. यावेळी नितीन याने ज्ञानेश्वर यांना त्यांच्या नावावर चारचाकी घेण्यास सांगत त्याचे कर्जाचे हप्ते मी भरतो, असे सांगितले. यानंतर ज्ञानेश्वर यांनी स्वत: १.८० लाखांचे डाऊन पेमेंट करून एका बँकेचे ३.५० लाख कर्ज घेतले. त्यानंतर नितीन याला गाडी घेऊन दिली. दरम्यान, नितीन याने कर्जाचे हप्ते भरले नसल्यामुळे ज्ञानेश्वर यांच्यावर संबंधित बँकेने १३८ अंतर्गत केस दाखल केली. यामुळे त्यांना १.२० लाख रुपये बँकेत भरावे लागले.
यामुळे ज्ञानेश्वर यांनी नितीन याच्याकडे ४ लाख ५७ हजार १६० रुपयांची चारचाकीची मागणी केली असता ती त्याने राजस्थान येथील ओळखीच्या व्यक्तीला विकली असल्याचे सांगत गाडी परत मिळणार नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्याने ज्ञानेश्वर यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचीही धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार २०१७ ते आजअखेर घडला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर यांनी शुक्रवार, दि. २ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नितीन सचदेव आणि राजू चौधरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.