वडूज : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या फीचा अपहार केल्याप्रकरणी उपशिक्षक आनंदा विठोबा जगदाळे (रा. पेडगाव (हल्ली वडूज)) यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार उपशिक्षक जगदाळे यांनी शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या नैदानिक परीक्षा, सराव चाचण्या, प्रथम सत्र, पूर्व परीक्षा, सराव परीक्षा १ व २, जादा सराव परीक्षा (घरी), एन. टी. एस. सराव, विद्यार्थी दिन, दहावी निरोप समारंभ, गणेशोत्सव आदींसाठी विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०१९ - २०ला जगदाळे १० वी (क)चे वर्गशिक्षक म्हणून कामकाज पाहत होते. या वर्गात सुमारे ६३ विद्यार्थी आहेत. यापैकी दोन विद्यार्थ्यांची फी माफ करुन इतर विद्यार्थ्यांची प्रत्येकी १ हजारप्रमाणे ६१ हजार रुपये फी गोळा केली होती. ही फी जगदाळे यांनी परीक्षा विभागप्रमुख घनवट मॅडम यांच्याकडे जमा न करता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. मुख्याध्यापक जाधव यांनी फी जमा करण्यासंदर्भात कार्यालयात बोलावून विचारणा केली असता, जगदाळे यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याबरोबर फी जमा करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार शांताराम ओंबासे करत आहेत.
दरम्यान, विद्यार्थी फीच्या अपहारप्रकरणी अटक केलेल्या जगदाळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार, दि. १७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
--------------------------------