फलटण : येथील एका खासगी रुग्णालयामध्ये बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला, तर असा काही प्रकार घडल्याच नसून आमच्यावर खोटे आरोप केल्याचा दावा दुसऱ्या गटाने केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, येथील एका खासगी रुग्णालयात एक कोविड रुग्णाचे निधन झाले. सोमवारी सकाळी रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आले असता रिसेप्शनवर असणाऱ्या महिलेने त्यांना बिल भरण्यास सांगितले. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून अर्वाच्च शब्द वापरल्याने त्या महिलेने याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तर ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी या घटनेचा इन्कार केला असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, लाखो रुपये घेताना त्याचे बिलही त्यांनी दिले नाही. आम्ही बिलाची पावती मागितली म्हणून त्यांनी आमच्यावर खोटे आरोप केले आहेत. हॉस्पिटलमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी बघावेत आणि डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.