लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या फोटोमध्ये आपण सुंदर दिसावं, व्हिडिओमध्ये आपला लूक हटके असावा, म्हणून तरुणाईमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सची क्रेझ पाहायला मिळते, तर हाताळायला सोपा आणि टिकायला उत्तम असणाऱ्या चष्म्याची आवड मध्यमवयीनांबरोबर ज्येष्ठांमध्येही अबाधित आहे.
सध्या फॅशनचा जमाना आहे. त्यामुळे तरुणांपासून वृद्धापर्यंत अनेक जण चष्म्याशिवाय आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. काही जणांना चष्म्यापेक्षा लेन्स वापरणे सोयीचे वाटते. मात्र, कॉन्टॅक्ट लेन्सची योग्य ती काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग किंवा बुबुळाला इजा पोहोचू शकते. त्यामुळे डोळ्याच्या सुरक्षेसाठी लेन्सच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे नेत्रतज्ज्ञ सांगतात.
अनेक लोक छान दिसावं म्हणून चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. लेन्सचा पर्याय जरी सोईस्कर असला तरी त्या लेन्स हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यात जरा जरी निष्काळजीपणा झाला, तर डोळ्यांना इजा होण्याची भीती असते.
...ही काळजी घेणे आवश्यक
कॉन्टॅक्ट लेन्सची स्वच्छता ठेवणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. लेन्सचा वापर करून झाल्यानंतर लेन्सची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या द्रवपदार्थांचा वापर करावा. शिवाय लेन्स सहा ते आठ तासांपेक्षा अधिक काळ वापरता कामा नये.
लेन्स लावण्यापूर्वी व काढल्यानंतर सोल्युशनद्वारे त्यांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी लेन्स काढणे गरजेचे आहे. लेन्सला हात लावण्यापूर्वी त्या स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
चष्म्याला करा बाय-बाय
चष्मा का लागतो याची अनेक कारणे आहेत. अनेकांना याची अडचण होते. विशेषत: रात्रीच्या वेळी बाहेर पडताना, गाडी चालवताना याचा त्रास होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. कॉन्टॅक्ट लेन्समुळे चष्म्यापासून सुटका मिळू शकते. लेन्स डोळ्यात असल्याने त्या बाहेरून दिसत नाहीत. त्यामुळे लेन्सकडे तरुणाईला ओढा अधिक आहे.
(कोट)
कॉन्टॅक्ट लेन्सची सर्वाधिक क्रेझ तरुणाईमध्ये आहे. सोशल मीडियावर टाकायला वापरण्यात येणाऱ्या व्हिडिओसाठी विविध रंगांच्या लेन्स घेणे ते पसंत करतात. मध्यवयीन आणि ज्येष्ठ सुरक्षिततेचा विचार करून चष्मा घेण्याला अजूनही प्राधान्य देतात.
-शोएब इनामदार, ऑप्टिकल व्यावसायिक
स्वच्छतेची काळजी न घेतल्यास किंवा त्यांचा वापर कसा करावा, याची माहिती नसल्यानेही कॉन्टॅक्ट लेन्समुळे संसर्गाचा धोका वाढतो. लेन्स नाजूक असते. त्यामुळे ती हाताळताना विशेष काळजी घ्यावी लागते.
-डॉ. श्रीराम भाकरे, नेत्ररोगतज्ज्ञ