सातारा : शहरातील अवैध बांधकामाबाबत पालिकेने आश्वासन देऊनही कारवाई न केल्याने येथील दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत अतिक्रमणे हटविली नाहीत तर पालिकेला न्यायालयात खेचणार असल्याचे सुशांत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. मोरे यांनी माहिती अधिकाराखाली शहरातील अवैध बांधकामांची माहिती मागविली होती. ४९९ इतकी अनधिकृत बांधकामे या माहितीत पुढे आली होती. ही बांधकामे पालिकेने त्वरित हटवावीत, या मागणीसाठी मोरे यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. पालिकेने कारवाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर मोरे यांनी उपोषण मागे घेतले. २००८ पासून ही बांधकामे पालिका प्रशासनाने पाडली नाहीत. तसेच आश्वासनानंतरही बड्या धेंडांच्या अतिक्रमणांना पालिकेने हात घातलाच नाही. शास्तीच्या नोटीसा बजावूनही संबंधितांनी दंडाची रक्कम पालिकेच्या खजिन्यात भरली नाही. मोरे यांच्या उपोषणानंतर पालिकेने १५ दिवस काही सर्वसामान्य नागरिकांची अतिक्रमणे काढत असल्याचे चित्र भासवले. मात्र, धनदांडगे, व्यापारी, नगरसेवक व काही नागरिक यांची अनधिकृत बांधकामे पाडलीच नाहीत. उलट या बांधकामांकडे दुर्लक्षच केले. नगररचनाकार व भागनिरीक्षक यांनी आर्थिक साटेलोटे करुन संबंधित अवैध बांधकामांकडे पाठ फिरविली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वत: लक्ष घालूनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. भवानी पेठ, सदाशिव पेठ, खणआळी, सदरबझार, शनिवार पेठ, पोवईनाका इ. परिसरातील अतिक्रमणे तातडीने पाडावीत. नागरिकांना चांगले रस्ते, फूटपाथ, वाहतुकीची समस्या इ. मूलभूत गरजा पालिकेने द्याव्यात, तसेच दरम्यान, दहावी-बारावी शिक्षण घेतलेले लोक भागनिरीक्षक म्हणून काम करत असल्याने या अडचणी निर्माण झाल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पालिकेला खेचणार कोर्टात
By admin | Updated: December 9, 2014 00:34 IST