भुईज : भुर्इंजमध्ये सापडलेला शस्त्रसाठा पंजाबहून कुरिअरने आला असल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली असून, या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तेही कुरिअरने शस्त्रसाठा आलाच कसा, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवार, दि. २२ आॅगस्ट रोजी भुर्इंज, ता. वाई येथे बेकायदा शस्त्रसाठा सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व भुर्इंज पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव, वरुण समरसिंह जाधव, केतन हणमंत धुमाळ, अतुल सखाराम जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, दहा तलवारी, अकरा गुप्त्या, पाच जांबिया असा शस्त्रसाठा सापडला होता. यातील तीन पिस्तुले ही छऱ्याचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव (वय १८, रा. भुर्इंज, ता. वाई) हा युवक पुणे येथे वास्तव्यास असताना त्याचा परिचय एका पंजाबी युवकाशी झाला होता. त्यानंतर पंजाबमध्ये अनेक वेळा जाऊन आलेल्या बंटी जाधवने हा शस्त्र कुरिअरने मागविला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने भुर्इंज गावात व परिसरात पुरवलेल्या हत्यारांची संबंधितांच्या नावासहित यादी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे व भुर्इंजचे सहायक पोलीस निरीक्षक नारायणराव पवार यांना मिळाली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. रविवारी चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आहे. याबाबतचा अधिक तपास सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुर्इंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नारायणराव पवार करीत आहे.
पंजाबहून कुरिअरने आला शस्त्रसाठा
By admin | Updated: August 23, 2015 23:50 IST