सातारा : ‘मोठा भ्रष्टाचार झाल्यानेच राष्ट्रवादी सत्तेबाहेर फेकली गेली आहे. या भ्रष्टाचाऱ्यांना वेळीच आवरले नाही तर पक्षाची मोठी हानी होईल, हे मी पवार साहेबांना निक्षून सांगितले होते. जिल्ह्यातल्या या भ्रष्टाचारी नेत्यांची कुंडली माझ्याकडे आहे. या नेत्यांची तेवढी नैतिकता असेल तरी जनतेच्या दरबारामध्ये त्यांनी कुठेही मला बोलवावे, त्यानंतरच खऱ्या अर्थानं गद्दार कोण आहेत, ते समोर येईल,’ असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वपक्षाच्याच नेतेमंडळींना मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, सदस्य संदीप शिंदे यांना सोबत घेऊनच उदयनराजेंनी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर ही पत्रकार परिषद घेतली. उदयनराजे म्हणाले, ‘शिवाजीराव शिंदे यांच्यावर एकतर्फीपणे अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. तो बारगळला. एकाधिकारशाहीविरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय झाला. रामराजे म्हणतात बरं झालं पक्षातील घाण गेली; पण मात्र त्यांनी आरशासमोर उभे राहून पाहिलं तर त्यांचं प्रतिबिंबच त्यांना उत्तर देईल. राष्ट्रवादीची आत्ता जी अवस्था झाली आहे, ती त्यांच्यामुळेच झाली. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी त्यांचा पूर्वइतिहास तपासावा. त्यांच्यात नैतिकदृष्ट्या तेवढी ताकद राहिलेली नाही. देगावच्या कार्यक्रमात माझ्याविरोधात गळे काढणाऱ्यांनी कधीही समोरासमोर येऊन बोलावं. मी त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे.’ रामराजेंनी कुतून जरी प्रयत्न केला तरी जिल्ह्याचा स्वाभिमान बारामतीच्या दावणीला बांधू देणार नाही. पवार साहेबांनी कधीच सातारा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत विषय काढला नव्हता. त्यांना राजीनामे हवे असते तरी ते माझ्याशी बोलले असते. पक्षाचा कुठलाही आदेश नव्हता. तसेच पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेताना आम्हाला कधी चर्चेला बोलावलं गेलं नाही. जिल्ह्याला योध्यांची परंपरा आहे. चळवळीची परंपरा आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्याला दुसऱ्याच्या दावणीला बांधायला निघालेल्यांचा डाव उधळून द्यायला मी कायम तयार आहे, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील भ्रष्टाचारी नेत्यांची माझ्याकडे कुंडली !
By admin | Updated: August 3, 2016 00:22 IST