खटाव : शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा उत्सव म्हणून बेंदूर सणाकडे पाहिले जाते. परंतु यंदाही बेंदूर सणावर कोरोनाचे सावट आहे. बेंदूर सणावर अवलंबून असलेल्या बैलाच्या सजावटीसाठीचे दुकानदार गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे चिंतातूर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागात बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबून परिश्रम घेऊन मोती पिकवणाऱ्या बैलाची पूजा करण्याचा तसेच त्याला पुरणपोळी चारण्याचा हा एकच दिवस असतो. त्याची मनोभावे सेवा व पूजा करण्याचा हा शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा दिवस परंतु यावर्षी देखील कोरोनाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
याही वर्षी हा सण अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही. याची बऱ्यापैकी जाणीव ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. शेतकरी कोरोनाचे सावट असले तरी आपल्या बरोबर वर्षभर राबणाऱ्या बैलांची घरातच रितीप्रमाणे साध्या पद्धतीने त्याची पूजा करून त्याच्या प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.
कुंभारवाड्यात बेंदूर सणाच्या पूर्वसंध्येला मातीचे बैल बनविण्याची तसेच ते घरोघरी जाऊन देण्याची पद्धत आजही आहे. त्यामुळे कुंभारबांधव आधीपासूनच बैल बनवत असतात; परंतु मागील वर्षांपासून येऊ घातलेले कोरोनाच्या या महामारीमुळे लोकांच्यात उत्साह दिसून येत नाही.
कोट
कुंभारबांधवांना आसपासच्या खेड्यातून गावकी असल्यामुळे त्या गावात बैल पोहोचवताना कोरोनाच्या सावट असल्यामुळे गावात घरोघरी जाऊन मातीचे बैल देण्यास मनाई होतच आहे तर हेच बैल एखाद्या ठिकाणी ठेवण्यास सांगितले जात आहे त्यामुळे लोकांच्यामध्ये अजूनही कोरोनाची धास्ती असल्याचे जाणवत आहे.
- बळीराम कुंभार, खटाव
१९खटाव
खटावमध्ये कुंभारवाड्यात बेंदूर सणाच्या पूर्वसंध्येला मातीचे बैल बनवून तयार केले आहेत. (छाया : नम्रता भोसले)