पाचगणी: कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढल्याने पाचगणी येथे भरणारा बुधवार आठवडी बाजार वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचा आदेश प्रातांधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी पारित केला आहे. त्याची प्रत पाचगणी नगर परिषदेस देण्यात आली आहे. तसेच तहसीलदार कार्यालय महाबळेश्वर यांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी घेतला आहे.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) नगर परिषदेच्या क्षेत्रात तसेच शहरात लगतच्या परिसरात अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. शनिवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये १७ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर शहरालगतच्या भिलार, भौसे, खिंगर, आंब्रळ, काही गावांमध्येसुद्धा कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे.
पाचगणीमध्ये भरणारा बुधवाराच्या आठवडी बाजाराला परिसरातील गावातील तसेच शहरातील असंख्य लोक बाजार करीत असतात, तसेच भाजपाला विक्री करणारे व्यावसायिक व्यापारी जिल्ह्याच्या अनेक भागातून येत असतात. बाजारामुळे कोरोना संसर्ग पुन्हा फैलावू नये म्हणून साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत प्रातांधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी बाजार बंद ठेवण्याचे आदेश पाचगणी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पुढील आदेश येईपर्यंत पाचगणी येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
(चौकट)
विनामास्कमुळे कोरोनाचा फैलाव...
पाचगणी रविवारी उपलब्ध झालेल्या कोरोना अहवालात शहरातील तब्बल २६ जणांचे अहवाल बाधित आले आहेत. त्याच शहरालगतच्या ग्रामीण भागातही फैलाव वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनापुढे गंभीर प्रश्न उभा राहिला असून, अजूनही विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज आहे. याच विनामास्कमुळे कोरोनाचा फैलाव अधिकच गडद होत आहे. सामान्य नागरिक पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवेने चिंतातुर झाले आहेत.