लोकमत न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. कोरोना काळात येथील ग्रामीण रुग्णालयात ३६ आॅक्सिजन बेडसह कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. अनेक रुग्णांवर तेथे यशस्वी उपचार करण्यात आले. कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने आता केंद्र बंद करून तेथील नियमित रुग्णांवरील उपचार सुविधा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. डोंगरे, राजाराम जगताप, स्वप्नील सुतार उपस्थित होते.
तारळेत सावता माळी रयत बाजाराला सुरूवात
पाटण : तारळे (ता. पाटण) ग्रामपंचायतीच्या मोकळ्या आवारात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार भरविण्यात आला होता. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्या हस्ते या बाजाराचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रशासक, गाव कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी, मंडल कृषी अधिकारी उपस्थित होते. या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या शेतमालाची आवक होत आहे. ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध करून द्यावा तसेच शेतकऱ्यांनी उत्पादक कंपनीची स्थापना करून स्वत:ची उन्नती साधावी, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
विंग येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने साकारला रस्ता
कुसूर : विंग (ता. कऱ्हाड) येथील पाणंद परिसरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत तब्बल दीड किलोमीटरचा रस्ता स्वखर्चाने पूर्ण केला आहे. यापूर्वी केवळ त्याठिकाणी पाऊलवाट होती. रस्ता बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनीतून मार्ग काढला आहे. येथील प्रत्येकाने रस्त्यासाठी जमीन देत दातृत्व दाखवले. खास करून ऊस वाहतुकीचा प्रश्न या रस्त्यामुळे मिटला आहे. निवास गरुड, बाळासाहेब यादव, ज्ञानदेव यादव, बाबासाहेब यादव, संपत यादव, अधिक यादव, जयवंत पाटील, सुहास गरुड, सुभाष गरुड, बाळकृष्ण यादव, विजय कणसे, बाबासाहेब यादव, रमेश यादव यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी रस्ता तयार करण्यासाठी परिश्रम घेतले.
किरपे ते घारेवाडीपर्यंत रस्त्यात झुडपांचे साम्राज्य
तांबवे : किरपे ते घारेवाडी या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांचे साम्राज्य आहे. ढेबेवाडी तसेच कऱ्हाडला जाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, सध्या झुडपांमुळे वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघाताची शक्यता वाढते. त्यातच काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
कऱ्हाड - मसूर रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग
कोपर्डे हवेली : विद्यानगरमधून जात असलेल्या कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर वर्दळ वाढली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यानगरला रस्त्यानजीक अनेक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये अनेकजण खरेदीसाठी येतात. मात्र, त्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यानजीकच्या फलकांची मोडतोड
कऱ्हाड : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याकडेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सूचना तसेच दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. उंडाळे ते येळगाव दरम्यान लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची काही दिवसांपासून अज्ञातांकडून मोडतोड होत असल्याचे दिसून येत आहे. हे फलक अजूनही मोडलेल्या अवस्थेत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या रस्त्यानजीक फलक नसल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे.