लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : फलटण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. पूर्वी दिवसाला एक हजार रुग्ण आढळून येत होते. हा आकडा आता शंभरहून कमी झाला आहे. दरम्यान, संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्याने बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन न केल्यास पुुन्हा संक्रमणवाढीचा धोका उद्भवू शकतो.
कोरोनाची रुग्णसंख्या थोडीशी खालावल्याने प्रशासनाने नागरिकांना बाजारपेठेचे निर्बंध थोडे शिथिल केले आहेत. मात्र, नागरिक त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. कोरोना अजूनही संपलेला नाही आणि मोठी गर्दी करून लोक पुन्हा आपल्या कुटुंबीयांना अडचणीत आणू पाहत आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाबाधित व मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचे कारण म्हणजे, रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. तालुक्यात आता व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडही उपलब्ध होत आहेत. मात्र, कोरोनाची रुग्णसंख्या जशी वाढते, तशी बेडची गरजही अधिक वाढू लागते. हे गणित माहीत असतानादेखील बहुतांश नागरिक निर्धास्तपणे बाजारात फिरत आहेत.
फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या काही दिवस हजारच्या वर जात होती. प्रशासनाने अवलंबिलेल्या कडक धोरणामुळे ही संख्या आता शंभरहून कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठेतील निर्बंध अंशत: शिथिल केले आहेत. परंतु, बाजारपेठेतील वाढती गर्दी व नागरिकांचा निर्धास्तपणा पुन्हा एकदा कोरोनावाढीस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.