वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात २३ गुंठे क्षेत्रात उभे राहत असलेले कोरोना सेंटर लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.
वडूज ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटरच्या जागेची देशमुख यांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष सुनील गोडसे, नगरसेवक विपुल गोडसे, महेश गुरव, डॉ. संतोष मोरे, पृथ्वीराज गोडसे आदींची उपस्थिती होती.
प्रभाकर देशमुख म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संसर्गाचा प्रचंड वेग घेतला होता. यामध्ये युवा पिढीवर आघात होऊन बळीही गेले. त्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दुष्काळी भागातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून खटाव तालुक्यातील वडूज येथे, तर माण तालुक्यात म्हसवड येथे जम्बो कोविड सेंटरला तत्त्वत: मान्यता दिली. माझी कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी अमेरिकन इंडिया फाउंडेशन संस्थेने संपर्क साधून राज्यात जम्बो कोविड सेंटर उभे करण्यासाठी निधी देण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर साराप्लास्ट प्रा.लि. या कंपनीला जागा पाहणी करून कोविड सेंटर उभे करण्याच्या सूचना दिल्या. याबाबतचा अहवाल ही संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.
सुमारे चार कोटी खर्च अपेक्षित असलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये ८४ ऑक्सिजन बेड, तर १६ आयसीयू बेडची व्यवस्था असून, यामध्ये इतर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कलेढोण कुटीर रुग्णालयात पन्नास बेडच्या कोरोना केअर सेंटरची मागणी करून मंजुरी अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, कोरोनाकाळात ज्या कुटुंबातील आई- वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा मुला-मुलींसाठी पाचवी ते दहावी शैक्षणिक खर्च व शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचे शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी यावेळी जाहीर केले. याप्रसंगी साराप्लास्टचे व्यवस्थापक गुणाधर कुमधोजे, डॉ. सम्राट भांदुले, सचिन माळी, सज्जाद शेख, इम्तियाज बागवान, अक्षय थोरवे आदींची उपस्थिती होते.
फोटो : २० शेखर जाधव
वडूज येथे जम्बो कोविड सेंटरच्या जागेची पाहणी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, नगराध्यक्ष सुनील गोडसे, विपुल गोडसे यांनी केली. (छाया : शेखर जाधव)