फोटो झेडपीचा...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीसंदर्भात तात्पुरती प्रतीक्षा सूची प्रसिध्द झाली असून काही समाजकंटक याचा गैरफायदा घेत आहेत. त्यांच्याकडून नोकरी मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी होत आहे. अनुकंपाची भरती ही पारदर्शकच होईल. पैसे मागणाऱ्यांचा नंबर पोलीस तसेच जिल्हा परिषदेला द्यावा. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी दिला.
सातारा जिल्हा परिषदेतील स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष कबुले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष उदय कबुले म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अनुकंपा तत्त्वावरील नोकारीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तात्पुरती प्रतीक्षा सूची प्रसिध्द करण्यात आली आहे. ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. तसेच कोणत्याही उमेदवाराला नियुक्ती आदेशही देण्यात आलेला नाही. या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे आर्थिक देवाण-घेवाण किंवा वैयक्तिक लाभ घेतला जात नाही. तरीही तात्पुरत्या प्रतीक्षा सूची यादीचा काही जण गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांचा जिल्हा परिषदेशी काहीही संबंध नाही.
संबंधितांमुळे जिल्हा परिषदेची आणि पर्यायाने पदाधिकारी व अधिकाऱ्यांचीही बदनामी होत आहे. यासाठी अनुकंपा नियुक्तीसाठी कोणी पैशासाठी संपर्क साधल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संपर्क साधावा. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करता येईल.
जिल्हा परिषदेला इतिहास आहे. येथे गलथान कारभार होणार नाही. अनुकंपाची भरती पारदर्शकच होईल. तसेच संबंधित यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. हरकतीबाबत सुनावणी घेऊन अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली.
.......................................................