कराड
: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मंगळवारी काँग्रेस समर्थकांनीही अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज दाखल झाल्याची वार्ता कार्यक्षेत्रात पसरताच उलटसुलट चर्चांना राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे. आता यापैकी किती उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात उतरणार, हे पाहावे लागेल.
कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या एकत्रीकरणासाठी सध्या काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या आघाडीच्या पॅनेलमधून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अनेक काँग्रेस कार्यकर्ते इच्छुक आहेत. यातीलच काही इच्छुकांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याची चर्चा तर होणारच.
अर्ज दाखल केलेल्यांमध्ये सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नाना पाटील, जखिणवाडीचे माजी सरपंच अॅड. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचे वडील बापूसाहेब मोरे या आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी रयत पॅनेलमधून हे अर्ज भरले आहेत. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष नितीन थोरात, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मोहिते, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले आदी उपस्थित होते.
- चौकट
दरम्यान, काँग्रसचे नेते अॅड. उदयसिंह पाटील यांचे समर्थक, कराड तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष धनाजी थोरात, पंचायत समितीच्या माजी सदस्या ललिता थोरात, भागवतराव कणसे, सुजित थोरात यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
फोटो
कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना नाना पाटील; नरेंद्र पाटील