मलकापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कडक निर्बंधांना मलकापुरात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नेमके काय करायचे, या विवंचनेत सकाळपासूनच शहरातील काही व्यावसायिक अर्ध्यावर शटर ठेवून बसले होते. तर अनेकांनी नेहमीप्रमाणे व्यवसाय सुरूच ठेवले होते. त्यामुळे शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत व्यावसायिकांसह नागरिकांमध्येही संभ्रम दिसून आला.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंदचा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यानुसार मलकापूर शहरातील काही व्यावसायिकांनी सकाळपासूनच अर्ध्यावर शटर ठेवत बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र होते. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. काही व्यवसायिकांनी मात्र निर्बंध झुगारून व्यवसाय सुरूच ठेवल्याचेही दिसून आले. महामार्गासह प्रमुख राज्य मार्गांवर काही प्रमाणात वाहतूक सुरू होती. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगत व जखिणवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणी कोरोनाची भीती न बाळगता भाजी विक्रेत्यांनी मंडई थाटली होती तर खरेदीदारही घोळका करून खरेदी करत होते.
फोटो : ०६ केआरडी ०५
कॅप्शन : मलकापुरात मंगळवारी निर्बंधांबाबत संभ्रम असल्यामुळे काही व्यवसाय सुरू तर काही बंद होते. (छाया : माणिक डोंगरे)