लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वीज बिल थकबाकीमुळे वीज तोडण्याची कारवाई वीज वितरण कंपनीकडून केली जात आहे. वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देऊन, तोडण्याऐवजी जोडण्याचे काम चांगले केलेले असताना, असा प्रकार होत असेल तर ते निश्चितच वेदनादायी आहे. त्यामुळे थकबाकीबाबत टप्प्याटप्प्याने रक्कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
सध्या कोरोना महामारीने गेले वर्षभर ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व नागरिक त्रस्त आहेत. लॉकडाऊन, अनलॉक प्रकाराचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडला आहे. बहुतांशी सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक आणि मुख्यत्वेकरून शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीत, विद्यमान आधुनिक काळात वीज जोडणी अत्यावश्यक आहे. अशी वीज जोडणी, दिल्लीसारख्या राज्यामध्ये वीज बिल काही युनिटपर्यंत पूर्णतः माफ आहे. तेथे ठराविक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्याचे प्रतियुनिट दर देखील खूप कमी आहेत.
आजकाल वीज पुरवठा अत्यावश्यक झाला आहे. कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाईन चालू आहे. जर वीज पुरवठा नसेल, तर त्या घरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे. सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांतील बहुतांशी कामे ही वीज पुरवठ्यावर सुरू आहेत.
कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात वीज कंपनीने, वीज बिलांचेसुद्धा वाटप केलेले नव्हते. सदरची तीन-चार महिन्यांची वीज बिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना कौटुंबिक आर्थिक नियोजन बारगळलेले आहे. तसेच एकत्रित वीज बिल दिल्याने एकूण युनिट्सचा युनिट दर लागला गेल्याने त्या युनिटसंख्येनुसार वीज दर आकारून बिले दिली गेल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये वीज ग्राहकांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
दरम्यान, कारवाईत कोणाकोणाची वीज तोडली याचा आढावा घेऊन, त्याबाबतचा जागेवरच सोक्षमोक्ष त्या त्या वेळी लावताना संघर्ष अटळ ठरेल, असा गर्भित इशारादेखील उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.