- बाळासाहेब पाटील
सहकार व पणनमंत्री
विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला. सध्याचे राजकारण बदलत आहे. निवडणुकीच्या पद्धती बदलत आहेत. अशावेळी उंडाळकरांसारखे सेवाभावी व्यक्तिमत्त्व तयार होणे अवघड आहे. सेवाभाव ठेवून जनतेसाठी काम करणाऱ्या माणसांना जनता नेहमीच डोक्यावर घेते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विलासकाका. त्यांनी कधीही काँग्रेसची विचारधारा सोडली नाही.
- पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासकाका उंडाळकर हे कऱ्हाड दक्षिणसह राज्याच्या विकासात अग्रेसर होते. मतदारसंघात तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेला नेता म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या कालखंडात सहकार, सामाजिक, राजकीय, कृषी क्षेत्रांत भरीव काम झाले. कऱ्हाड दक्षिणचा जलदूत हरपला आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
- राजू शेट्टी
शेतकरी नेते व माजी खासदार
विलासराव पाटील-उंडाळकर हे राज्याचे दिग्गज नेते होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाने राज्यातील सहकार क्षेत्रातील आणि विशेषत: सातारा जिल्ह्यातील सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. जिल्हा बँक असो किंवा इतर सहकारी संस्था असोत. या सर्व संस्था प्रगतिपथावर आणण्याचे काम उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालीच झाले. जिल्ह्यामध्ये पुन्हा असे नेतृत्व होणार नाही.
- शंभूराज देसाई
गृहराज्यमंत्री
विलासकाकांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा आदर राखून राजकीय संस्कृती टिकविण्याचे त्यांचे कार्य आपण हाती घ्यायला हवे. विलासकाका हे महाराष्ट्रभर त्यांची पक्षनिष्ठा व कर्तृत्वसिद्ध नेते म्हणून प्रसिद्ध होते. तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा कैवार जपत त्यांच्या हालअपेष्टा त्यांनी दूर केल्या. दीन-दलितांचे ते आधार होते. मुत्सद्दी व तात्त्विक राजकारणी काळाच्या घाल्याने पंचत्वात विलीन झाले.
- डॉ. इंद्रजित मोहिते
उपाध्यक्ष, भारती विधापीठ.