मसूर : पाणी हेच सर्व आजारांचे मूळ कारण असल्याचे ओळखून ग्रामपंचायतीने उभारलेल्या जलशुद्धिकरण केंद्रामुळे ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी पावसाळ्यात व नेहमीच पिण्यासाठी या केंद्रातील पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
नवीन कवठे, ता. कऱ्हाड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त आयोग (पंचायत समिती स्तर) व ग्रामपंचायत फंडातून उभारलेल्या जलशुद्धिकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सचिव संगीता साळुंखे, सारंग पाटील, कऱ्हाड पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, प्रांत उत्तम दिघे, कवठेचे सरपंच लालासाहेब पाटील, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, शुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थांना पोटाचे विकार, मूतखडा असे आजार होणार नाहीत. शेतामध्ये वेगवेगळ्या औषध फवारणीमुळे पिण्याचे पाणी दूषित होत असते. त्यामुळे सर्वांनी याठिकाणी असणाऱ्या जलशुद्धिकरण केंद्राचा उपभोग घ्यावा व पाण्यापासून होणाऱ्या रोगापासून घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राखावे. येथे एक रुपयात शुद्ध पिण्याचे पाच लिटर पाणी मिळत आहे.
यावेळी मानसिंगराव जगदाळे, रमेश चव्हाण, लालासाहेब पाटील, आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास नवीन कवठेच्या सरपंच तेजस्विनी माने, उपसरपंच गणेश घार्गे, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी साळुंखे, रेश्मा यादव, सावित्री पाटोळे, सुजाता वायदंडे, विश्वासराव माने, दादासाहेब साळुंखे, एम. के. साळुंखे, विश्वास गणेशकर, धनाजी घार्गे, प्रताप साळुंखे, आत्माराम साळुंखे, विजयकुमार पाटणकर, ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच गणेश घार्गे यांनी स्वागत केले. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी पाटोळे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : कवठे, ता. कऱ्हाड येथे जलशुद्धिकरण केंद्राचा प्रारंभ करताना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, संगीता साळुंखे उपस्थित होते.