सातारा : बालगृहातील मुला-मुलींच्या कला व सुप्त गुणांना संधी देण्याचे काम जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत होत असून हे कौतुकास्पद आहे. बालगृहातील मुला-मुलींना एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना ठेऊन खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले यांनी केले.सातारा पोलीस कवायत मैदानावर जिल्ह्यातील सर्व बालगृहे आणि इतर विद्यालयातील मुलांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा शुभारंभ भिसले यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा घोगरे-काटकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी अतिष शिंदे, महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.विजय तावरे म्हणाले, बालगृहातील अनाथ, निराधार, उमार्गी, विधी संघर्षग्रस्त मुले-मुलींसाठी दि. ३० ते १ फेब्रुवारी कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, १०० मिटर धावणे, २०० मिटर धावणे, ४०० मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, उंच उडी, लांब उडी, अशा क्रिडा होणार आहेत. बौद्धिक स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, समूह गीते स्पर्धा होणार आहेत.विजेता व उपविजेत्या संघांना शिल्ड, ट्रॉफी, स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. बालकांना शिस्तीचे पालन व पंचांच्या निर्णयाचे स्वागत करण्याचे आवाहन केले. बाल कल्याण समितीमधील इतर सदस्य, बालगृहांचे अधिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बालगृहातील मुला-मुलींनी बंधुभाव, सांघिक भावना ठेवावी; सहायक कामगार आयुक्तांचे आवाहन
By प्रगती पाटील | Published: January 30, 2024 6:39 PM