पुसेगाव : पुसेगावमधून जाणाऱ्या सातारा - लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ठ दर्जाचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद होते. याच कामात सुधारणा करत ग्रामस्थांच्या काही अडचणी सोडवून पुन्हा या कामाला गती मिळाल्याने पुसेगाव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, आमदार महेश शिंदे व पुसेगावातील लोकप्रतिनिधींनी दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत आवाज उठवून योग्यरित्या काम करणार असल्यास पुन्हा काम चालू करा, अशा सूचना केल्या. त्यामुळेच कामात सुधारणा होऊन काम सुरू झाल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
एप्रिल महिन्यात शासकीय विद्यानिकेतनपासून सेवागिरी मंगल कार्यालयापर्यंत संबंधित ठेकेदाराने काम करत आणले होते. मुरूम, खडीऐवजी रस्त्याची केवळ माती भरून उंची वाढवल्याने या रस्त्यालगतच्या घरात तसेच दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी साठण्याची तसेच भविष्यात हा रस्ता खचण्याची शक्यता गृहित धरून संबंधित ठेकेदाराला रस्त्याचे काम व्यवस्थितरित्या करण्याबाबत आमदार महेश शिंदे, रणधीर जाधव व इतर लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या. तेव्हापासून या रस्त्याचे काम बंद पडले होते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वच नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे सांडपाणी अडून राहिल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
गेल्या दोन दिवसांपासून या कामाला गती मिळाली असून, आजूबाजूच्या नागरिकांच्या तसेच दुकानदारांच्या मागणीनुसार खोदकाम करून आवश्यक प्रमाणात रस्त्याची उंची कमी करण्यात आली आहे. मात्र, या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने पुसेगावातील मुख्य बाजारपेठेतून सेवागिरी मंदिरापर्यंत पूर्ण करावे तसेच ठरल्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा भुयारी गटारे, विद्युत खांबांची योग्य रचना, गावातील पाणीपुरवठा योजना योग्य पध्दतीने पूर्ण करून द्यावी, अशी मागणी पुसेगावमधील नागरिकांनी केली आहे.
फोटो : पुसेगाव येथील सातारा - लातूर रस्ता महामार्गाच्या कामाला गती आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.