लोणंद : येथील मालोजीराजे ज्युनिअर कॉलेजच्या मैदानात गोळाफेकीच्या परीक्षेवेळी बाहेरून आलेल्या चौघांनी लोखंडी फायटर, सायकलची चेन व लाथाबुक्क्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात दोघे जखमी झाल्यानंतर संतप्त जमावाने शिरवळ चौकात ‘रास्ता रोको’ केला. तसेच लोणंदमध्ये ‘बंद’ही पाळण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. मालोजीराजे ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर शनिवारी सकाळी दहाला गोळाफेकीची परीक्षा सुरू होती. त्याचवेळी लोणंद येथील सलमान कच्छी, बबलू कच्छी, इजाज आत्तार, राकेश माने हे मैदानात आले. त्यानंतर या मुलांनी सुमित सतीश धायगुडे (रा. सुखेड) याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अविनाश राजेंद्र शेळके (रा. लोणंद) याने ‘बाजूला जाऊन तुमची भांडणे करा,’ असे म्हटले. तेव्हा चौघांनी अविनाशलाही फायटर, चेन व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने तो जखमी झाला. त्यावेळी अविनाशच्या हातातील सोन्याची अंगठी पडली. ‘आम्हाला बाजूला जा म्हणणारा तू कोण? तुला गुप्तीने भोसकून मारले पाहिजे,’ असा दमही दिला. हा प्रकार समजल्यानंतर भांडणे सोडविण्यासाठी काही ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हाही या गटाची ग्रामस्थांशी शाब्दिक चकमक झाल्याने तणाव निर्माण झाला. ‘मारहाण करणाऱ्या तरुणांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करा,’ या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोणंद येथील शिरवळ चौकात ‘रास्ता रोको’ केला. त्यानंतर ‘लोणंद बंद’चीही घोषणा केली गेली. शहरातील अनेक दुकाने बंद झाली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी जमावाशी चर्चा करून लोणंदमधील दुकाने उघडण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. चारही तरुणांना अटक केली असून, दुसऱ्या गटाची फिर्याद दाखल करण्याची प्रक्रियाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)
‘कॉलेज वॉर’नंतर लोणंद बंद !
By admin | Updated: January 24, 2016 00:16 IST