सातारा : जिल्ह्यातील थंडीत सतत चढ-उतार सुरू असून, रविवारी साताऱ्यात १५.०१ अंश किमान तापमानाची नोंद झाली, तर सध्याच्या हिवाळी ऋतूत थंडीची तीव्रता अधिक जाणवलीच नाही.
जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर थंडीला सुरुवात झाली. हळू-हळू थंडी वाढू लागली. दिवाळीच्या दरम्यान किमान तापमान १२ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. मात्र, त्यानंतर थंडी गायब झाली होती. किमान तापमान २१ अंशांवरही गेले होते. त्यामुळे उकाडाही जाणवत होता. त्यानंतरही थंडीच्या प्रमाणात सतत चढ-उतार सुरू होता. असे असले तरी डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशांखाली आले, तर सातारा शहरात ९ अंश तापमानाची नोंद झाली होती. दोन वर्षांतील हे नीचांकी तापमान ठरले होते.
डिसेंबर महिन्यात कमी तापमानाची नोंद झाल्यानंतर पुन्हा थंडी कमी झाली. जानेवारी महिन्यातही थंडी कमीच राहिली. आता तर सतत तापमान १४ अंशांवर असते. त्यातच यापुढे थंडी वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यावर्षीच्या हिवाळा ऋतूत थंडीची तीव्रता जाणवतच नाही, असेच दिसून आले आहे.
चौकट :
सातारा शहरातील किमान तापमान असे :
दि. २४ जानेवारी १६, दि. २५ जानेवारी १६.०४, दि. २६ जानेवारी १५.०७, दि. २७ जानेवारी १४.०६, दि. २८ जानेवारी १४.०२, दि. २९ जानेवारी १४.०७, दि. ३० जानेवारी १४.०६ आणि ३१ जानेवारी १५.०१
......................................................