सातारा : येथील गुरुवार पेठेत गेल्या १0 वर्षांपासून सुरु असलेल्या बेकायदा बिफ मार्केटमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. पालिकेने हे मार्केट बंद करण्याचा ठराव दहा वर्षांपूर्वीच केला होता; परंतु तरीही लोकांच्या जीवावर उठणाऱ्या या मार्केटकडे पालिकेतील अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला. नगरसेवक विजय बडेकर व आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पिसचे तालुकाध्यक्ष सागर भिंगारदेवे यांच्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेतली. त्यांच्याशी यावर सविस्तर चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. गुरुवार पेठेतील सि.स. नं. ७१0 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बिप व्यवसाय सुरु आहे. हा व्यवसाय भरवस्तीत असून यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मार्केट बंद करण्यात यावा, यासाठी आंदोलने, मोर्चे काढले तरीही प्रशासनाने दिरंगाई वृत्ती कायम ठेवली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार दि. ३0 जुलै २00३ रोजी सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बिप मार्केट बंद करण्याचा ठराव मंजूर केला होता. माजी नगरसेवक अमित कुलकर्णी यांनी त्यावेळी सभागृहात सूचना मांडली होती. अमर गायकवाड यांनी त्याला अनुमोदन दिले होते. तेव्हा ठरावाद्वारे बिफ मार्केट बंद करण्याचा निर्णय झाला असतानाही हे मार्केट बेकायदा सुरु आहे. पालिकेच्याच जागेतील या बेकायदा प्रकाराकडे पालिकेने दुर्लक्ष केले. (प्रतिनिधी)'अधिकाऱ्यांना आतल्या हाताने....!गुरुवार पेठेतील हा बिप व्यवसाय पालिका अधिकाऱ्यांना पैसे देऊन सर्व शासकीय नियम, कायदे धाब्यावर बसवून सुरु आहे. नगरपालिकेचा कत्तलखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद असताना हा प्रकार सुरु आहे, असा आरोप नागरिकांनी केला असून या जनावरांची तपासणी कोणते डॉक्टर करत आहेत?, त्या जनावरांना कोठे कापले जाते?, याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी व या बेकायदा प्रकाराला खतपाणी घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मध्यवस्तीतील बेकायदेशीर व्यवसायाने नागरिक हैराण!
By admin | Updated: December 10, 2014 23:56 IST