फलटण : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे आज, शनिवारी (दि. १३) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.माजी आमदार चिमणराव ऊर्फ सूर्याजीराव शंकरराव कदम हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता फलटण तालुक्यात समजताच सर्वत्र शोककळा पसरली. दिवंगत चिमणराव कदम यांनी तडफदार व अभ्यासू स्वभावाच्या जोरावर विधानसभा गाजविली होती. जनतेच्या प्रश्नांवर ते सत्ताधाऱ्यांना नेहमी कोंडीत पकडत असत. ते १९८० ते १९९५ या कालावधीत सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले होते. फलटण पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी सलग अकरा वर्षे काम केले. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे करून नावलौकिक मिळविला होता. चिमणराव कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव मुंबईहून उद्या, रविवारी सकाळी फलटण येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. तेथे काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवून गिरवी (ता. फलटण) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
चिमणराव कदम यांचे निधन
By admin | Updated: December 14, 2014 23:59 IST