म्हसवड : ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त करण्यासाठी, मुलांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी प्राथमिक शाळेतच मुलांना क्रीडा कौशल्य आत्मसात होणे गरजेचे आहे,’ असे मत ऑलिम्पियन अँड कॉमनवेल्थ मेडलिस्ट अपर्णा पोपट यांनी व्यक्त केले.
शांतिनिकेतन येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद सांगली व माणदेशी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी दि. १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी अखेर जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन शांतिनिकेतन विद्या मंदिर सांगली या ठिकाणी करण्यात आले असून, या प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सांगलीच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी राहुल गावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, माजी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, माणदेशी चॅम्पियन प्रभात सिन्हा आदी पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मानदेशी फाउंडेशनच्यावतीने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्रीराम बाबर, सविता देशमुख, ओंकार गोंजारी, कुशल भागवत, सारंग नवाळे, समर्थ गुजरे, मयूर लोखंडे, दीपाली शेळके, सचिन मेनकुदळे आदी उपस्थित राहणार आहे.