सातारा : ठेवीदारांच्या रकमा वेळेवर परत मिळत नसल्यामुळे ‘पीएसील’ तथा ‘पर्ल्स’ कंपनीवर ‘एमपीआयडी अॅक्ट १९९९’ अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ठेवीदारांनी या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांची कऱ्हाडमध्ये भेट घेतली आणि आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान, यावेळी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटीलही यावेळी उपस्थित होते.अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, ठेवीदार प्रतिनिधी चंद्रकांत घाडगे, तात्या उर्फ उत्तम सावंत आणि शंभरहून अधिक ठेवीदारांनी मंगळगवारी कऱ्हाड येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पर्ल्स कपंनीत रक्कम गुंतवलेल्या ठेवीदारांना मुदत संपल्यानंतरही रक्कम परत मिळालेली नाही.या कंपनीत सातारा जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांचे जवळपास सातशे ते आठशे कोटी रुपये अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील लाखो ठेवीदारांचे जवळपास ८ हजार कोटी अडकून पडले आहेत. दरम्यान, ठेवीदारांच्यावतीने बाजू मांडताना जगताप म्हणाले, ‘पर्ल्स कंपनीवर महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरेस्ट आॅफ डिपॉझिटर्स (इन फायनान्सिएल इस्टॅब्लिशमेंट) अॅक्ट १९९९’ नुसार कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. ‘एमपीआयडी अॅक्ट’च्या कलम ४ चे ३ तरतुदीनुसार जिल्हाधिकारी प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या तक्रारी ऐकून कारवाई करता येऊ शकते. त्याचबरोबर पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तरतूद असून असे झाले तर शासन कॉम्पिन्ट अॅथॉरिटी नेमून कंपनी आणि संचालकांच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करू शकणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांच्या रकमा सुरक्षित होणार आहेत. ही माहिती ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पर्ल्स’वर होणार ‘एमपीआयडी’ अंतर्गत कारवाई करण्याबाबत अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि प्रत्यक्षात त्या अनुषंगाने कार्यवाही करू असे आश्वासन ठेवीदार आणि अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासला दिले. (प्रतिनिधी)
‘पर्ल्स’वर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
By admin | Updated: November 25, 2014 23:47 IST