महाबळेश्वर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हेलिकॉप्टरने सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरात आगमन झाले. खासगी दौरा असून केवळ विश्रांतीसाठी आल्याचे त्यांनी निकटवर्तीयांना सांगितले. स्वागतासाठी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, पाचगणी नगराध्यक्षा लक्ष्मी कºहाडकर यांच्यासह जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व निवडक शासकीय अधिकारी उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण विश्रांतीसाठी दोन दिवसांच्या दौर्यावर महाबळेश्वर येथे आले असून शहर व परिसरातील अडीअडचणींबाबत स्थानिक कार्यकर्त्यांसह चर्चा करणार आहेत. आज महाबळेश्वर येथील राजभवनात आल्यानंतर नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर व पाचगणी नगराध्यक्ष लक्ष्मी कºहाडकर यांनी दोन्ही पर्यटनस्थळासंदर्भात प्राथमिक चर्चा केली. माजी पंचायत समिती सभापती एम. पी. फळणे यांनी कोयना भागातील तरुणांच्या शैक्षणिक विकासासाठी येणार्या अडचणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मांडून तेथील मुलांना भोजन खर्च व वसतिगृह मिळावे, अशी मागणी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी अडचणीतून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन देऊन इमारतीसाठी फंडांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री विश्रांतीसाठी महाबळेश्वरात
By admin | Updated: May 9, 2014 00:06 IST