स्वातंत्र्यदिनाची आठवण सांगताना ते म्हणाले, रविवार पेठेत गीते बिल्डिंगमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यालय होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने तिथे सभाही झाली. पूर्वनियोजित नसलेल्या या सभेला सातारकरांनी चांगलीच हजेरी लावली होती. राजवाड्यावर सकाळी जवाहर बागेत झेंडा वंदन करून काही सातारकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांना अभिवादन केले.
पंताचा गोट येथील ८५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ बाबर म्हणाले, देश स्वतंत्र झाला तेव्हा ते १० वर्षांचे होते. त्यांच्या घरासमोर बाबालाल मुल्ला नावाचे पोस्टमन रहात होते. तारखात्यात काम करणारे पठाण आणि मुल्ला यांच्यातील संवाद त्यांच्या कानावर पडला. तार खात्यात असल्याने त्यांना देश स्वतंत्र झाल्याची खबर त्यांना सगळ्यांच्या आधी मिळाली. त्यावेळी प्रसारमाध्यमे सशक्त नव्हती. देश स्वतंत्र झाला आणि त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानची निर्मिती झाली. उत्तरेकडील राज्यांत दंगल झाल्याने दोघांत काळजी चर्चा होती. ही चर्चा ऐकल्यानंतर आम्ही मुलंमुलं लगेच पटांगणात जमलो. देश स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव तेथे साजरा झाला. पंताच्या गोटात अठरापगड जातीचे लोक राहतात. त्यामुळे उत्तर भारतात काही अघटित घडले तरी त्याचे कोणतेही सावट पंताच्या गोटात आम्हाला दिसले नाही. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय गीते बिल्डिंगच्या माडीवर होते. यशवंतराव चव्हाण, किसन वीरआबा आणि बऱ्याच नेतेमंडळींच्या जलद हालचाली त्यावेळी पंताच्या गोटात पहायला मिळाल्या, अशा आठवणींना जगन्नाथ बाबर बोलताना उजाळा दिला.
स्वतंत्र भारताचा नकाशा काढण्यातही आनंद
भारत स्वतंत्र झाल्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलच्या युवकांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल मिरवणूक काढली. यावेळी या युवकांनी भारताचा नकाशा काढला होता. भारतापासून पाकिस्तान एक दिवस आधीच वेगळे झाले होते. त्यामुळे स्वतंत्र भारताचा नकाशा काढण्यात युवा दंग होते. त्यांच्या या नवनिर्मितीचा आनंद उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच मनसोक्तपणे घेतला.