लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लॉकडाऊनच्या काळात छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील दुकान फोडून साहित्य लंपास केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकाला अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला. धनाजी बबन घाडगे (रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) असे त्याचे नाव आहे.
लॉकडाऊनच्या काळात झालेल्या या चोरीच्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित कैद झाला होता. त्यावरून संशयित माजगावकर माळ झोपडपट्टी परिसरातील असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. २९ जानेवारीला तो करंजे परिसरात आल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. प्रारंभी त्याने चुकीची उत्तरे दिली. परंतु, कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेला ५ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत शाहूपुरी ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, हवालदार हसन तडवी, सचिन माने, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, नितीन घोडके, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, सचिन पवार, मनोहर वाघमळे आदींनी सहभाग घेतला.
........................................................