लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लष्करात भरती करून घेण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या टोळीचा पुण्यातील वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे, तर एक फरार आहे. पुणे पोलिसांच्या तपासात पेपर फुटीचे फलटण आणि बारामती कनेक्शन समोर आले असल्याने आता सातारा जिल्ह्यातील सर्वच भरतीपूर्व केंद्रांची तपासणी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बनावट कागदपत्रांच्या आधारे लष्करात भरती करून देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने एका टोळीला अटक केली होती. त्यामध्ये लष्कराच्या भरती कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाच्या तपासात या घोटाळ्यात बारामती आणि फलटण येथील काही जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. बारामती येथील एक जण, तर फलटणमधील एकाचा लष्कर भरतीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांपर्यंत पाहोच करण्याची जबाबदारी पार पाडली होती. पोलीस तपासात दोघांनीही या घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे स्पष्ट झाले असून, फलटणमधील संबंधित संशयित आरोपी फरार आहे.
याप्रकरणी आता सातारा जिल्ह्यातील सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांकडून ११ मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.