मलकापूर : आगाशिवनगर येथे ऊसतोड सुरू असताना, फडात बिबट्याचे पिल्लू आढळले. याबाबत तातडीने वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ दोन तासांतच आईची व पिल्लाची भेट घडवून आणली. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणची ऊसतोडणी दोन दिवस थांबविण्यात आली आहे. मात्र, नागरी वस्तीपासून केवळ पाचशे मीटर अंतरावर मादीसह बिबट्याचा वावर असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आगाशिवनगर मलकापूर, ता. कराड येथे विनोद शामराव शिंगण यांची शेती आहे. कराड-ढेबेवाडी रस्त्यापासून कोयना नदीच्या बाजूला त्यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. ऊसतोडणी सुरू असताना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे पिल्लू असल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. याबाबतची खबर शेतकरी विनोद शिंगण यांना दिली. विनोद शिंगण यांनीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांसह कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. ते पिल्लू ताब्यात घेऊन उपवनसंरक्षक सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव, कराड वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी साडेपाच वाजता सेटअप लावला. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आईची व पिल्लाची भेट घडवली. या बछड्याची आईशी भेट घडवण्यासाठी मलकापूर वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, अक्षय पाटील, पथकातील सदस्य रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, भरत पवार, अमोल माने, गणेश काळे, रोहित पवार, मयूर लोहाना, नीलेश पाटील, संदीप व्हेल्हाळ, अनमोल शिंगण यांनी सहभाग घेतला होता. यावेळी लगतच्या शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Web Summary : In Agashivnagar, Satara, a leopard cub found during sugarcane harvesting was quickly reunited with its mother by forest officials within two hours. Sugarcane harvesting halted for two days as a precaution due to the leopard's presence near residential areas.
Web Summary : सतारा के आगाशिवनगर में, गन्ना कटाई के दौरान पाए गए तेंदुए के बच्चे को वन विभाग के अधिकारियों ने दो घंटे के भीतर उसकी माँ से मिला दिया। रिहायशी इलाकों के पास तेंदुए की मौजूदगी के कारण एहतियात के तौर पर गन्ने की कटाई दो दिन के लिए रोक दी गई है।