वडूज : येथील कुमठे रस्त्यालगत वास्तव्यास असणाऱ्या धनश्री सुभाष शिंदे यांच्या राहत्या घरात तीन चोरट्यांनी घुसून जीवे मारण्याची धमकी देत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिंदे कुटुंबीय रविवार दि. ७ रोजी रात्री दहाच्या सुमारास जेवण करून झोपी गेले होते. तीन व्यक्तींनी मध्यरात्री दीडच्या सुमारास घराच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारल्याने दरवाजा कडीतून निसटला. त्यावेळी घरात तीन व्यक्ती धनश्री सुभाष शिंदे यांच्याजवळ जाऊन ‘तू इथून हालू नकोस, नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली.’ यानंतर घरातील कपाटातील डब्यातून साडेनऊ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल व साडेचार हजार रुपये रोख रक्कम असे एकूण मिळून सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
चोरट्यांचा शोध घेण्यासाठी साताऱ्याहून श्वानपथकाला पाचारण केले होते. या घरफोडीची नोंद वडूज पोलीस ठाण्यात केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर तपास करीत आहेत.