कऱ्हाड : ‘वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज देशाने प्रगती केली आहे. त्यामुळे औषधनिर्माण क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्षेत्राची निवड करावी,’ असा सल्ला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, सहायक संचालक व्ही. जी. तांबे, डॉ. एस. बी. भिसे, डी. ई. खोमणे, दिलीप पाटील, अरुण पवार, श्रीकांत देसाई, विकास पाटील, विनोद अग्रवाल, महेंद्र काशीद, राजीव खलिपे, अजय भट्टड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षणाची गंगा कऱ्हाडमध्ये आणली. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन आम्ही कार्य करीत आहे.’ आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘कऱ्हाड भागाच्या विकासाचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी रचला. त्यांनी शहरासह तालुक्याच्या विकासासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले. सध्या पृथ्वीराज चव्हाण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.’ प्राचार्या डॉ. एफ. जे. सय्यद यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव विकास पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
औषधनिर्माण क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य : चव्हाण
By admin | Updated: December 26, 2014 23:51 IST