लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसवड : वडिलोपार्जित शेत जमिनीवर वारसदार नाव नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी करून त्यातील दाेन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरकुटे-म्हसवड सजाचा तलाठी दादासो अनिल नरळे (वय ३७) याला बुधवारी रंगेहात पकडले. वरकुटे- म्हसवड तलाठी कार्यालयात नरळेवर सापळा रचण्यात आला हाेता. गावकामगार तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने माण महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये तक्रारदाराच्या बहिणीचे वारसदार सदरी नाव नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची तलाठ्याने मागणी केली होती. त्यातील दोन हजार रुपये स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले आहे. तलाठी नरळे (रा. पाणवण, ता. माण) याच्याविराेधात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली हाेती. त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर नरळेविरोधात एसीबीने सापळा रचला. त्यात ताे दाेन हजार रुपये घेताना सापडला.