वाठार स्टेशन : स्वच्छ व निर्जंतुक पाणी देऊन एका बाजूने भविष्याची काळजी घेताना दुसऱ्या बाजूने बोअरवेल परिसरात तुंबलेल्या गटारातील पाणी बोअरवेल पुनर्भरण योजनेतून आता ग्रामस्थांना प्यावे लागणार आहे. या योजनेचा उद्देश जरी चांगला असला, तरी योग्य काळजी न घेतल््यास हे ‘विकतचं दुखणं’ ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सध्या कोरेगाव तालुक्यात ग्रामपंचायत हद्दीतील बोअरवेलचे पुनर्भरण करण्याचे काम सुरू आहे. एका गावासाठी ८४ हजार ११५ रुपयांची मंजुरी असून, बोअरवेलशेजारी अंदाजे पाच फुटांवर जमिनीत पाच इंची उभे बोअरवेल ६५ ते ७० फूट खोलीचे घेऊन त्याशेजारी अंदाजे २ बाय २ च्या खड्ड्यात मुरूम, वाळू भरून त्याचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. बऱ्याच ठिकाणी हे पुनर्भरण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने भविष्यात यातून उद््भवू शकणाऱ्या परिणामांनाही ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. देऊर गावात संबंधित ठेकेदारांनी नुकतेच बोअरवेल पुनर्भरणाचे काम केले आहे. परंतु, बोअरवेलच्या शेजारील गटारे नेहमीच तुंबलेली असल्याने हे पाणी या खड्ड्यात उतरून तेच सांडपाणी या बोअरवेलच्या माध्यमातून लोकांना प्यावे लागण्याची शक्यता आहे. कोरेगाव तालुक्यातील आसनगाव, पळशी, देऊर या गावांत ही कामे सुरू असून, आणखीही काही गावांमध्ये ती सुरू केली जाणार आहेत. ती योग्य पद्धतीने केली जावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)
बोअरचं पाणी जरा जपून!
By admin | Updated: October 16, 2014 22:52 IST