साखरवाडी : न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी या कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारे नवनाथ सुंदर नरुटे व सोनू बाळू कोळेकर हे पाचसर्कल खामगावजवळ नीरा उजवा कालवा येथे कपडे व बैल धुण्यासाठी गेले असता वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली. नवनाथ सुंदर नरुटे (वय ३०, मूळ रा. हनुमंतगाव-चिखली, ता. आष्टी, जि. बीड) यांचे कुटुंबीय व इतर मजूर नीरा उजवा कालव्यावर बैल व कपडे धुण्यासाठी गेले होते. शाळेला सुटी असल्याने सोनू बाळू कोळेकर (१२, मूळ रा. चिंचवली काळदात, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा पाण्यात वाहून जाऊ लागला. दरम्यान, ही घटना पाहिल्यानंतर नवनाथ नरुटे यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेही वाहून गेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला असता परिसरातील लोक धावून आले. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्री उशिरापर्यंत दोघेही सापडले नाहीत. याची नोंद साखरवाडी पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
नीरा उजव्या कालव्यात दोघे वाहून गेल्याची भीती
By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST