सातारा : सुर्ली (ता. कऱ्हाड) येथील बसथांब्यावर गावठी पिस्टल बाळगणार्या एकाला सातारा एलसीबीच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे असा सुमारे ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याकडे ज्याने पिस्टल ठेवण्यास दिले होते तो गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. त्यानंतर दुसर्या संशयितालाही वांगी (जि. सांगली) येथून पोलिसांनी अटक केली. अमोल जगन्नाथ माने (वय ३२, रा. वनवासमाची, ता. कऱ्हाड), संभाजी संपत मदने (रा. बनवडी कॉलनी, ता. कऱ्हाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, सुर्ली (ता. कऱ्हाड) येथील बसथांब्याजवळील परिसरामध्ये एकजण गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. यानंतर या पथकाने सुर्ली बसथांबा येथे दि. ६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित माने याला पकडून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हे पिस्टल व काडतुसे दुसर्या एकाने त्याच्याकडे ठेवण्यास दिली आहेत, असे सांगितले.
या अनुषंगाने खात्री केली असता, ज्याने पिस्टल ठेवण्यासाठी दिले होते, तो संशयित संभाजी मदने हा कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नोव्हेंबर २०२०पासून फरार असून, तो वांगी (जि. सांगली) येथे असल्याचे पोलिसांना समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी जावून सापळा लावून मदने याला शिताफीने ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींविरुध्द कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, जोतीराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, प्रवीण अहिरे, नीलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, रवींद्र वाघमारे, मंगेश महाडिक, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, राजकुमार ननावरे, रोहित निकम आदींनी केली.
फोटो आहे