वाठार स्टेशन : रेल्वे अस्तित्वात आल्यापासून, अगदी ब्रिटिश काळापासून राज्य मार्गांवरील तसेच छोट्या-मोठ्या रस्त्यांवरील रेल्वे गेट अजून तशीच आहेत. त्याऐवजी आता स्वयंचलित ‘बूम गेट’ची जोडणी रेल्वे प्रशासनाकडून सुरू झाली असून, ही गेट लवकरच कार्यरत होणार आहेत. सातारा-लोणंद राज्य मार्गावर असलेले एकमेव देऊर रेल्वे फाटक, तसेच वाठार-वाई रस्त्यावरील रेल्वे फाटक, वाठार-कोरेगाव मार्गावरील रेल्वेचे फाटक अजून जुन्याच प्रकारचे आहे. ही फाटके आता बदलण्यात येत असून, याच ठिकाणी आता डिजिटल स्वयंचलित ‘बूम गेट’ व्यवस्था जोडण्याचे काम सुरू आहे.पूर्वापार असलेल्या फाटकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून, नव्याने जोडलेले ‘बूम गेट’ वजनाने हलके आहे. ते विद्युत बटनाद्वारे बंद करण्याची आणि उघडण्याची सोय आहे. त्यामुळे या गेटचे कार्यान्वयन करण्यासाठी वेळेची व श्रमाची बचत होणार आहे. पूर्वीचे फाटक वजनदार असल्याने व वायरच्या साह्याने हॅण्डलद्वारे ओढून बंद करावे लागते. यापुढे स्वयंचलित ‘बूम गेट’ वापरात येणार आहे. सद्य:स्थितीत या गेटची जोडणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच रेल्वेचे हे नवे गेट कार्यरत होणार आहे. (वार्ताहर)
जुन्या रेल्वे फाटकाऐवजी लवकरच ‘बूम गेट’
By admin | Updated: November 24, 2014 23:06 IST