महाबळेश्वर : येथील अंध उद्योजक भावेश भाटिया यांची यंदाच्या अंध स्वयंरोजगार राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार ३ डिसेंबर रोजी जागतिक अंधदिना दिवशी भाटिया यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. १ लाख रुपये, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.भावेश भाटिया यांना लहानपणापासूनच थोड्याफार प्रमाणात अंधत्व यायला सुरुवात झाली होती. परंतु नंतर तरुणपणी मात्र संपूर्ण अंधत्व आले. अशा परिस्थितीत सुद्धा निराश न होता त्यांनी चिकाटीने काही महिने मुंबई येथे मेणबत्ती बनविण्योच शिक्षण घेतले व अंधांची ब्रेल लिपीसुद्धा शिकून घेतली. अत्यंत छोट्या जागेत महाबळेश्वर येथे त्यांनी मेणबत्ती व्यवसाय सुरू केले. आपल्या कल्पकतेच्या व जिद्दीच्या जोरावर त्यांनी थोड्याच दिवसांत विविध आकराच्या विविध रंगांच्या मेणबत्त्या व मेणाचे पुतळे तयार करण्यास सुरुवात केली.सध्या त्यांनी मेणाचे पूर्णाकृती पुतळे बनविण्यासाठी घेतले असून लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी यांचे अत्यंत आकर्षक पुतळे आतपर्यंत त्यांनी तयार केले आहेत. जगातील सर्वात उंचमेणबत्ती बनविण्याचा त्यांचा मानस आहे. (प्रतिनिधी)
भावेश भाटियांना राष्ट्रपती पुरस्कार
By admin | Updated: November 24, 2014 23:18 IST