पुसेसावळी : खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात व गुलाल खोबऱ्याची उधळण करीत श्री भैरवनाथाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या रथोत्सवाला हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. जयराम स्वामींचे वडगाव येथील मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. सकाळी नऊच्या दरम्यान सुरू झालेला रथोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू होता. रथोत्सवात आबालवृद्धांचा आनंद ओसांडून वाहत होता. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. भैरवनाथ मंदिर, मुख्य बाजारपेठ, ज्योतिर्लिंग मंदिर, बसस्थानक, ब्राह्मणगल्ली ते भैरवनाथ मंदिर असे रथाचे मार्गक्रमण झाले. रथावर भाविकांनी मोठ्या संख्येने देणगी अर्पण केली. यात्रेत लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे व करमणुकीची साधने मोठ्या प्रमाणावर आली होती. विविध वस्तूंचे स्टॉल, मिठाईची दुकाने आली होती. (वार्ताहर)
‘चांगभलं’च्या जयघोषात भैरवनाथाचा रथोत्सव
By admin | Updated: April 27, 2015 00:10 IST