कऱ्हाड : माणसं गेली; पण आकडे बोलतायत, अशी कऱ्हाडची अवस्था आहे. एकीकडे बाधितांचे प्रमाण वाढत असताना तालुक्यात मृत्यूतांडवही सुरूच असून गत तीस दिवसांत तालुक्यातील तब्बल दीडशे रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गत वर्षभरापासून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या ५३४ असून, मृतांमध्ये ४१ वर्षांवरील व्याधीग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे.
कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्यामुळे प्रशासनाने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बहुतांश बाजारपेठ खुली होण्याची चिन्हे आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू होताच संपूर्ण बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. या गर्दीत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना पायदळी तुडवल्या जात असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, ही बेफिकिरी पुन्हा संक्रमणाचा वेग वाढविण्यास कारणीभूत ठरण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत.
कोरोना हा विषय कितीही कंटाळवाणा झाला असला तरी परिस्थिती नाकारून किंवा दृष्टीआड करून चालणार नाही. संक्रमण कमी झाले, याचा अर्थ कोरोना संपला असा नाही. गत महिन्याचा विचार करता कऱ्हाड तालुक्यात मे महिन्यामध्ये सहा हजारपेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली, तर तब्बल दीडशे रुग्ण मृत्युमुखी पडले. त्यामुळे बाजारपेठ खुली होत असली तरी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- कोट
कोरोना संक्रमण कमी झाले असले तरी ते पूर्णपणे थांबलेले नाही. तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही १८.१२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करावा. बेफिकीर राहू नये. बेजबाबदारपणा कोरोनाला निमंत्रण देऊ शकतो.
- डॉ. संगीता देशमुख
तालुका आरोग्य अधिकारी, कऱ्हाड
- चौकट
महिनानिहाय मृत्यू
जानेवारी : ०
फेब्रुवारी : ०
मार्च : १३
एप्रिल : ३६
मे : १४८
- चौकट
आरोग्य केंद्रनिहाय आजअखेरचे मृत्यू
कऱ्हाड : ८४
काले : ८१
वडगाव : ५७
सदाशिवगड : ४१
येवती : ५०
उंब्रज : ४५
सुपने : ४४
रेठरे : ३५
मसूर : ३३
कोळे : ३१
इंदोली : २१
हेळगाव : १२
- चौकट
वयानुसार मृतांची संख्या
वय : मृत्यू
०-१ : ०
१-१० : ०
११-२० : २
२१-३० : १२
३१-४० : २२
४१-५० : ५८
५१-६० : १२४
६१ वर : ३१६
- चौकट
एकूण मृतांमध्ये...
पुरुष : ३६६
महिला : १६९
- चौकट
चाचणी ते मृत्यूपर्यंतचा कालावधी
२४ तासांत : ८५
४८ तासांत : ९३
१ ते ५ दिवस : १२८
६ ते २१ दिवस : २२६
निदान न झालेले : २