वाई : ‘दिव्यांग विद्यार्थ्यांना हाल-अपेष्टा,उपेक्षा आता सहन करावी लागणार नाही, त्यांच्याबद्दल सहानुभूती नव्हे, समानानुभूती बाळगूया, दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार,’ असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांनी केले.
समग्र शिक्षा अभियान व समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हील चेअर, मॉडिफाय चेअर, एमआर किट, श्रवणयंत्र, एलबो क्रेचेस अंध काठ्या, रोल लेटर आदी साहित्य चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, सदस्य अनिल जगताप, रजनी भोसले, मधुकर भोसले, सुनीता कांबळे, दीपक ननावरे, ऋतुजा शिंदे, गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गट शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले. पंचायत समितीच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.
चव्हाण म्हणाल्या, ‘दिव्यांग विद्यार्थ्यांना सहजतेने शिक्षण घेता यावे. दैनंदिन जीवनात त्यांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागावा, यासाठी मदतीची भूमिका घेणे, हे सहानुभूतीचे कार्य आहे.’
विद्यार्थी, पालकांना वरील साहित्य प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू मेमाणे, साईनाथ वाळेकर, समावेशित शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.