सातारा : एक्साईज ड्यूटी कराच्या धोरणाविरोधात सराफ असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे दागिने बनविणाऱ्या बंगाली कारागिरांना उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील जवळपास दोनशे कुटुंबे उधार मागून उदरनिर्वाह चालवित आहेत. तर काही कारागीर गावाकडे परतू लागले आहेत.महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनबरोबरच देशातील सर्व सुवर्णकार व्यापारी संघटनांनी १ मार्चपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारी गटाई कारागिरांबरोबरच परराज्यातून म्हणजेच बंगालमधून आलेल्या सुवर्ण कारागिरींनाही या बंदची झळ बसली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण पाचशे कारागीर आहेत. यापैकी सातारा शहरातील बाजार पेठेत दोनशे कारागीर आपली उपजीविका या कामातून करत असतात. सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदला दहा दिवस होऊन गेले; मात्र कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे ग्राहकांमध्येही असंतोष निर्माण झाला असून, सराफांच्या दागिन्यांना वेगवेगळ्या डिझाईन करण्यासाठी आलेल्या बंगाली कारागीरही या संपामुळे हतबल झाले आहेत. यातील काही कारागीर रोजंदारीवर काम करतात. त्यांना दिवसा तीनशे ते पाचशे रुपये मिळतात. यातून त्यांचा प्रपंच चालतो. आज ना उद्या हा संप मिटेल, अशी अशा ठेवून सराफांकडून उधार मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. ज्या कारागिरांची कुटुंबे नाहीत. अशी सुमारे शंभर कारागीर गावाकडे परतले आहेत. अजून काही दिवस हा संप मिटला नाही तर बाकीचे कारागीरही गावाकडे जाणार असल्याचे मती सायूउद्दीन मंडळ या कारागिराने ‘लोकमत’ला सांगितले.गेल्या वीस ते तीस वर्षांपासून बंगाली कारागीर साताऱ्याच्या भूतेबोळ, पाचशेएक पाटी, व सराफ बाजार पेठेत आपली कारागिरीची कामे करतात. सातारकरांसाठी त्यांनी कलकत्ता व बंगाली पद्धतीचे डिझाईन सोन्याचे दागिन्यामध्ये बनवून आपल्या कारागिरीचा एक वेगळा ठसा उमटविला आहे. याला सातारकरांनीही पसंती दिली आहे. (प्रतिनिधी)
बंगाली कारागीर गावाकडे !
By admin | Updated: March 11, 2016 23:14 IST