लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे धुमशान आता काही दिवसांत सुरू होणार आहे. जिल्हा बँकेत राजकारण आणायचे नाही, मात्र सत्ता आपलीच राहिली पाहिजे यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. साहजिकच ‘महाविकास आघाडीचा फॉर्म्युला’ जरी बाजूला पडला तरी आपल्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन एक नवे ‘राजकीय रसायन’ राष्ट्रवादीच्यावतीने तयार केले जाऊ शकते. सध्या तरी ‘रणांगणाआधी सर्वच घोडी पाणवठ्यावर अडली’ असे चित्र पाहायला मिळते.
जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. विरोधकांनी जरी या सत्तेला हादरा देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला तरीदेखील त्यांना त्यात यश आले नाही. राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याने जिल्हा बँकेची सत्ता राष्ट्रवादीकडून खेचून घेण्याचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. आताही तीच परिस्थिती आहे. महाविकास आघाडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना यांचा राष्ट्रवादीशी थोडा का होईना ‘घरोबा’ वाढलेला आहे. याच ‘नात्यानं’हे दोन्ही पक्ष आपल्याला जिल्हा बँकेत संधी मिळेल, ही अपेक्षा ठेवून आहेत. सध्यातरी काँग्रेसकडून दबावाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसते.
भाजप आमदार जयकुमार गोरे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्णयावरच विसंबून आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे हे स्वतःच्या ताकदीवर जिल्हा बँकेत निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्यांचे आव्हान मोठे आहे. नुकतीच बाजार समितीची निवडणूकदेखील गोरे यांनी जिंकलेली आहे. गोरेंच्या विरोधकांना एकत्र घेऊन राष्ट्रवादी सोसायटी मतदार संघात त्यांच्याविरोधात व्यूहरचना आखू लागली आहे. इतर ठिकाणी समझोता करून मार्ग काढण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भर दिलेला पाहायला मिळतो.
उदयनराजेंची ही अडचण नाही..
खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये असले तरी बँकेच्या राजकारणामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणताही अडथळा येऊ दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांची अडचण वाटत नाही. शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे या दोघा भावांनी मिळून काय तो निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. उदयनराजेंना संधी दिली गेल्यास बँकेमध्ये भाजपला प्रतिनिधीत्व मिळणार आहे.
माण वाऱ्यावर कसा सोडायचा?
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी माण तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत सर्व नेते विरोधात असताना देखील आमदार गोरे यांनी विजय खेचून आणला. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत देखील जयकुमार गोरे यांनी बाजार समितीवर प्राबल्य मिळवले. जिल्हा बँकेत जयकुमार गोरे हेच राष्ट्रवादीचे प्रमुख शत्रू आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी आणि माण तालुका वाऱ्यावर न सोडण्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली आहे.
शंभूराज-पाटणकर समेट घडवावा लागेल
जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाटण तालुका सोसायटी मतदारसंघांमधून विक्रमसिंह पाटणकर अनेक वर्षांपासून संचालक म्हणून काम करत आहेत. मागील निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती मात्र ती फोल ठरली आता शंभूराज हे राज्यात मंत्री आहेत. मात्र, पाटण तालुक्यामध्ये शंभूराज आणि पाटणकर यांच्या गटांमध्ये अजूनही समेट घडलेला नाही. तो झाला नाही तर याठिकाणी संघर्ष निश्चित आहे.
काँग्रेस अडून बसली तर..
राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसवर मात केली. राज्याच्या राजकारणात हे पक्ष एकत्र असले तरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये कायमच संघर्ष सुरू असतो. आता या निवडणुकीमध्ये काँग्रेसने चार जागा अपेक्षित धरल्या आहेत. त्यामध्ये कऱ्हाड तालुका सोसायटी मतदारसंघामधून ॲड. उदयसिंह पाटील यांना उमेदवारी मिळावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. याच ठिकाणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तयारी सुरू केली असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर कऱ्हाड तालुक्यातदेखील संघर्ष पाहायला मिळेल.
जिल्हा बँकेचा फोटो वापरावा