सातारा : राजकीय दबावामुळे फार्स ठरलेल्या बसाप्पा पेठेतील टपऱ्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न पालिकेने धसास लावला. मात्र, संचारबंदीचा फायदा घेत संबंधितांकडून पुन्हा एकदा टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. या अतिक्रमणाला नगरसेवकच खतपाणी घालत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
जुन्या सेनॉर हॉटेल चौकातील टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने संचारबंदीपूर्वी पोलीस बंदोबस्तासह मोठी तयारी केली होती. मात्र, राजकीय दबावामुळे पालिकेच्या अतिक्रमण हटाव कारवाईचा केवळ फार्स झाला होता. मात्र, यानंतर पालिकेने धडक कारवाई करीत बसाप्पा पेठेच्या सेनॉर चौकातील तब्बल सहा बंद टपऱ्या हटविल्या. गटई खोक्याचा अपवाद वगळता बंद टपऱ्यांचे अतिक्रमण हटल्याने बसाप्पा पेठेतून करंजेत जाणाऱ्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता.
या कारवाईला अजून महिना होत नाही तोपर्यंत जुन्या सेनॉर हॉटेल चौकात पुन्हा एकदा टप्प्यांची रांग वाढू लागली आहे. संबंधित टपरीधारकांनी रस्त्याकडेला सिमेंट काँक्रिटीकरण करून त्यावर टपरी थाटली आहे. संचारबंदीच्या कालावधीत पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम बंद असल्याने टपरी धारकांकडून या संधीचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे. विशेष म्हणजे नगरसेवकच या अतिक्रमणाला खतपाणी घालत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शहरातील अतिक्रमणांचा विषय गांभीर्याने घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
फोटो मेल : पालिका अतिक्रमण
साताऱ्यातील बसप्पा पेठेतील जुन्या सेनॉर हॉटेल चौकात पुन्हा एकदा टपऱ्या उभारल्या आल्या आहेत.