सातारा : ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार करून त्यांचे आजार बरे केले जातात, अशा जिल्हा रुग्णालयाच्या छताचा वापर काही तळीरामांकडून चक्क मद्य पिण्यासाठी केला जात आहे. तर ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक न्याय मागण्यासाठी येतात, ज्याठिकाणी सातारा शहराचा कारभार चालतो, अशा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये चक्क मटका घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या शोधपत्रिकेतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांवर बारीक लक्ष ठेवून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नेहमीच्या ठिकाणी चालणारे अवैध धंदे बंद झाले असले तरी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, या म्हणीप्रमाणे काही तळीराम आणि जुगार खेळणाऱ्यांनी शासकीय इमारतींचा वापर अशा कारणांसाठी सुरू केला आहे. जिल्ह रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांची ये-जा सुरू असते. हा परिसर नेहमी गर्दीने फुललेला असतो. रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर, कर्मचारी हे आपापल्या कामात व्यस्त असतात. या धावपळीचा फायदा घेऊनच काही हौशी मद्यपी रुग्णालयाच्या छतावर जाऊन बैठक मारून मद्यप्राशन करत आहेत. याठिकाणी कोणीही फिरकत नसल्याचा अंदाज घेऊन हा सारा प्रकार घडत असतो. अगदी आपल्या कोणी पाहणारच नाही, अशा आविर्भात तळीराम बिनधास्तपणे मद्याच्या बाटल्या समोर मांडून, तोंडी लावायला चकणा घेऊन बसतात. रुग्णालयाचे छत म्हणजे जणू काही ‘खुला बार’ असल्यासारखा वापर होताना दिसत आहे. नगरपालिका इमारतीबाबतही अशीच काहीशी परिस्थिती आहे. सर्वसामान्य नागरिक नगरपालिकेत आपले प्रश्न घेऊन येत असतात. त्यामुळे याठिकाणीही दिवसभर वर्दळ असते. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये सहज गेले तरी तेथे पडलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्यांवरून आपल्या लक्षात येऊ शकते की जुगारीमंडळी या स्वच्छतागृहाचा वापर मटका अड्डा म्हणून करत आहेत. या स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्या अनेकांच्या निदर्शनास या गोष्टी येत आहेत. स्वच्छतागृहात येऊन गुपचूप ‘चिठ्ठी’ करण्याचे काम होत आहे. पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी) आरोग्यविषयक जाहिरात फलकावरच मद्यपींची बैठक जिल्हा रुग्णालयाच्या छतावर रात्रीच्या वेळी मद्यपींनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या जाहिरातीवरच मद्याच्या बाटल्या मांडून बैठक व्यवस्था तयार केली आहे. विविध आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तयार केलेल्या जाहिरात फलकांचा असा वापर होत असताना मात्र याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.‘स्वच्छ-सुंदर सातारा’ मोहिमेला हरताळ!स्वच्छ-सुंदर साताऱ्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरपालिका इमारतीच्या भिंती पाहिल्या तर गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसतात. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कामानिमित्त येणाऱ्या काही नागरिकांकडून इमारतीच्या भिंती अस्वच्छ करण्याचे काम होत आहे. पालिकेची इमारत म्हणजे जणू काही आपलीच मालमत्ता समजून दिसला कोपरा की तोंडातला तोबरा टाकला जात आहे. याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्यामुळे ‘स्वच्छ-सुंदर सातारा’ मोहिमेला पालिकाच हरताळ फासत असल्याचे बोलले जात आहे.दिव्याखाली अंधार!जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. काही जण दारूचे व्यसन सोडण्यासाठी येथे येतात. व्यसनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र, ज्याठिकाणी व्यसनी लोकांवर उपचार केले जातात, त्याच शासकीय रुग्णालयाच्या छतावर बैठक मारुन काही जण छुप्या पद्धतीने मद्यप्राशन करत आहेत. रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पालिकेत मटका अन् जिल्हा रुग्णालयात ‘बार’!
By admin | Updated: June 11, 2015 00:21 IST